अध्याय 10

। श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥
 

गाठी होते पूर्वपुण्य । म्हणूनी पावलो नरजन्म । याचे सार्थक उत्तम । करणे उचित आपणा ॥१॥

 

ऐसा मनी करुनी विचार । आरंभिले स्वामीचरित्र । ते शेवटासी नेणार । स्वामी समर्थ असती पै ॥२॥

 

हावेरी नामक ग्रामी । यजुर्वेदी गृहस्थाश्रमी । बाळाप्पा नामे द्विज कोणी । राहते होते आनंदे ॥३॥

 

संपत्ती आणि संतती । अनुकूल सर्व तयांप्रती । सावकारी सराफी करिती । जनी वागती प्रतिष्ठित ॥४॥

 
 

तीस वर्षांचे वय झाले । संसाराते उबगले । सद़्गुरुसेवेचे दिवस आले । मती पालटली तयांची ॥५॥

 

लटिका अवघा संसार । यामाजी नाही सार । परलोकी दारा पुत्र । कोणी नये कामाते ॥६॥

 

इहलोकी जे जे करावे । परलोकी त्याचे फळ भोगावे । दुष्कर्माने दुःख भोगावे । सत्कर्मे सौख्य पाविजे ॥७॥ बाळाप्पाचे मनात । यापरी विचार येत । सदा उद्विग्न चित्त । व्यवहारी सौख्य वाटेना ॥८॥

 

जरी संसारी वर्तती । तरी मनी नाही शांती । योग्य सद़्गुरु आपणाप्रती । कोठे आता भेटेल ॥९॥

 

हाचि विचार रात्रंदिन । चित्ताचे न होय समाधान । तयांप्रती सुस्वप्न । तीन रात्री एक पडे ॥१०॥

 

पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी । भरोनी आपणापुढे येती । पाहोनिया ऐशा गोष्टी । उल्हासले मानस ॥११॥

 

तात्काळ केला निर्धार । सोडावे सर्व घरदार । मायापाश दृढतर । विवेकशस्त्रे तोडावा ॥१२॥

 

सोलापुरी काम आम्हांसी । ऐसे सांगून सर्वत्रांसी । निघाले सद़्गुरु शोधासी । घरदार सोडिले ॥१३॥

 

मुरगोड ग्राम प्रख्यात । तेथे आले फिरत फिरत । जेथे चिदंबर दिक्षीत । महापुरुष जन्मले ॥१४॥

 

ते ईश्वरी अवतार । लोकां दाविले चमत्कार । तयांचा महिमा अपार । वर्णू केवि अल्प मती ॥१५॥

 

स्वामीचरित्र वर्णितां । चिदंबर दिक्षीतांची कथा । आठवली ते वर्णिता । सर्व दोष हरतील ॥१६॥

 

महायात्रा संकल्पेकरुन । जन निघती घराहून । परी मार्गी लागल्या पुण्यस्थान । स्नानदान करिताती ॥१७॥ महायात्रा स्वामीचरित्र । ग्रेथ क्रमिता मी किंकर । मार्गी लागले अति पवित्र । चिदंबराचे पुण्यस्थान ॥१८॥

 

तयांचे घेउनी दर्शन । पुढे करावे मार्गक्रमण । श्रोती होउनी सावधान । श्रवणी सादर असावे ॥१९॥

 

मुरगोडी मल्हार दीक्षित । वेदशास्त्री पारंगत । धर्मकर्मी सदारत । ईश्वरभक्त तैसाची ॥२०॥

 

जयांची ख्याती सर्वत्र । विद्याधनाचे माहेर । अलिप्तपणे संसार । करोनी काळ क्रमिताती ॥२१॥

 

परी तया नाही संतती । म्हणोनिया उद्विग्न चित्ती । मग शिवाराधना करिती । कामना चित्ती धरोनी ॥२२॥

 

द्वादश वर्षे अनुष्ठान । केले शंकराचे पूजन । सदाशिव प्रसन्न होऊन । वर देत तयांसी ॥२३॥

 

तुझी भक्ती पाहोन । संतुष्ट झाले माझे मन । मीच तुझा पुत्र होईन । भरवसा पूर्ण असावा ॥२४॥

 

ऐकोनिया वरासी । आनंदले मानसी । वार्ता सांगता कांतेसी । तीही चित्ती तोषली ॥२५॥

 

तियेसी झाले गर्भधारण । आनंदले उभयतांचे मन । जो साक्षात उमारमण । तिच्या उदरी राहिला ॥२६॥

 

अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी । इच्छामात्र घडी मोडी । तो परमात्मा त्रिपुरारी । गर्भवास भोगीत ॥२७॥

 

नवमास भरता पूर्ण । कांता प्रसवली पुत्ररत्न । मल्हार दीक्षिते आनंदोन । संस्कार केले यथाविधी ॥२८॥

 

चिदंबर नामाभिधान । ठेवियले तयालागून । शुक्ल पक्षीय शशिसमान । बाळ वाढू लागले ॥२९॥

 

प्रत्यक्ष शंकर अवतरला । करु लागला बाललीला । पाहोनी जनी-जनकाला । कौतुक अत्यंत वाटतसे ॥३०॥

 

पुढे केले मौजीबंधन । वेदशास्त्री झाले निपुण । निघंट शिक्षा व्याकरण । काव्यग्रंथ पढविले ॥३१॥

 

एकदा यजमानाचे घरी । व्रत होते गजगौरी । चिदंबर तया अवसरी । पुजेलागी आणिले ॥३२॥

 

मृत्तिकेचा गज करोन । पूजा करिती यजमान । यथाविधी सर्व पूजन । दीक्षित त्यांसी सांगती ॥३३॥

 

प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता । गजासी प्राण येउनी तत्त्वता । चालू लागला हे पाहता । विस्मित झाले यजमान ॥३४॥

 

बाळपणी ऐशी कृति । पाहोनी सर्व आश्चर्य करिती । हे ईश्वर अवतार म्हणती । सर्वत्र ख्याती पसरली ॥३५॥

 

ऐशी लीला अपार । दाखविती चिदंबर । प्रत्यक्ष जे का शंकर । जगदुद्धारार्थ अवतरले ॥३६॥

 

असो पुढे प्रौढपणी । यज्ञ केला दीक्षितांनी । सर्व सामग्री मिळवूनी । द्रव्य बहुत खर्चिले ॥३७॥

 

तया समयी एके दिनी । ब्राह्मण बैसले भोजनी । तूप गेले सरोनी । दीक्षिताते समजले ॥३८॥

 

जले भरले होते घट । तयांसी लाविता अमृतहस्त । ते घृत झाले समस्त । आश्चर्य करिती सर्व जन ॥३९॥

 

तेव्हा पुणे शहरामाजी । पेशवे होते रावबाजी । एके समयी ते सहजी । दर्शनाते पातले ॥४०॥

 

अन्यायाने राज्य करीत । दुसऱ्यांचे द्रव्य हरीत । यामुळे जन झाले त्रस्त । दाद त्यांची लागेना ॥४१॥

 

तयांनी हे ऐकोन । मुरगोडी आले धावोन । म्हणती दीक्षितांसी सांगून । दाद आपुली लावावी ॥४२॥

 

रावबाजीसी वृत्तान्त । कर्णोपकर्णी झाला श्रुत । म्हणती जे सांगतील दिक्षीत । ते अमान्य करवेना ॥४३॥

 

मग दीक्षितांसी निरोप पाठविला । आम्ही येतो दर्शनाला । परी आपण आम्हांला । त्वरीत निरोप देईजे ॥४४॥

 

ऐसे सांगता दीक्षितांप्रती । तये वेळी काय बोलती । आता पालटली तुझी मती । त्वरीत मागसी निरोप ॥४५॥

 

कोपला तुजवरी ईश्वर । जाईल राज्यलक्ष्मी सर्व । वचनी ठेवी निर्धार । निरोप तुज दिला असे ॥४६॥

 

सिद्धवाक्य सत्य झाले । रावबाजीचे राज्य गेले । ब्रह्मावर्ती राहिले । परतंत्र जन्मभरी ॥४७॥

 

एके समयी अक्कलकोटी । दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी । तेव्हा बोलले स्वामी यती । आम्ही त्याते जाणतो ॥४८॥

 

यज्ञसमारंभाचे अवसरी । आम्ही होतो त्यांच्या घरी । तूप वाढण्याची कामगिरी । आम्हांकडे तै होती ॥४९॥

 

लीलाविग्रही श्रीस्वामी । जयांचे आगमन त्रिभुवनी । ते दीक्षितांच्या सदनी । असतील नवल नसेची ॥५०॥

 

महासिद्ध दीक्षित । त्यांचे वर्णिले अल्पवृत्त । मुरगोडी बाळाप्पा येत । पुण्यस्थान जाणोनी ॥५१॥

 

तिथे ऐकिला वृत्तान्त । अक्कलकोटी स्वामीसमर्थ । भक्तजन तारणार्थ । यतिरुपे प्रगटले ॥५२॥

 

अमृतासमान रसाळ कथा । ऐकता पावन श्रोता-वक्ता । करोनिया एकाग्र चित्ता । अवधान द्यावे श्रोते हो ॥५३॥

 

पुढले अध्यायी कथन । बाळाप्पा करील जप ध्यान । तयाची भक्ती देखोन । स्वामी कृपा करतील ॥५४॥

 

भक्तजनांची माउली । अक्कलकोटी प्रगटली । सदा कृपेची साउली । आम्हांवरी करो ते ॥५५॥

 

मागणे हेचि स्वामीप्रती । दृढ इच्छा माझे चित्ती । शंकराची प्रेमळ प्रीती । दास विष्णुवरी असो ते ॥५६॥

 

इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत प्रेमळ भक्त । दशमोऽध्याय गोड हा ॥५७॥

 

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Translate »