ऐसे लोटता काही दिवस । बाळाप्पाचिया शरीरास । व्याधी जडली रात्रंदिवस । चैन नसे क्षणभरी ॥३९॥
बेंबीमधूनिया रक्त । वहातसे दिवसरात्र । तया दुःखे विव्हळ होत । म्हणती कैसे करावे ॥४०॥
भोग भोगिला काही दिन । कागदाची पुडी बेंबीतून । पडली ती पाहता उकलोन । विष त्यात निघाले ॥४१॥
पूर्वी कोण्या कृतघ्ने । बाळाप्पासी यावे मरण । विष दिधले कानोल्यातून । पडले आज बाहेर ॥४२॥
स्वामीकृपेने आजवरी । गुप्त राहिले होते उदरी । सद़्गुरुसेवा त्यांचे करी । व्हावी लिखित विधीचे ॥४३॥
आजवरी बहुतापरी । बाळाप्पा करी चाकरी । तयाचे अंतर परी । स्वामीमय न जाहले ॥४४॥
प्रत्येक सोमवारी तयांनी । महादेवांची पूजा करोनी । मग यावे परतोनी । स्वामीसेवेकारणे ॥४५॥
हे पाहोनी एके दिवशी । बाई विनवी समर्थांसी । आपण सांगुनी बाळाप्पासी । शंकरपूजनी वर्जावे ॥४६॥
तैशी आज्ञा तयाप्रती । एके दिनी समर्थ करिती । परी बाळाप्पाचे चित्ती । विश्वास काही पटेना ॥४७॥
बाईच्या आग्रहावरुन समर्थे दिली आज्ञा जाण । हे नसेल सत्य पूर्ण । विनोद केला निश्चये ॥४८॥
पूजा करणे उचित । न करावी हेचि सत्य । यापरी चिठ्ठ्या लिहित । प्रश्न पाहत बाळाप्पा ॥४९॥
एक चिठ्ठी तयातून । उचलुनी पाहता वाचून । न करावेची पूजन । तयामाजी लिहिलेसे ॥५०॥
तेव्हा सर्व भ्रांती फिटली । स्वामी आज्ञा सत्य मानिली । ही भानगड पाहिली । श्रीपाद भटजीने ॥५१॥
समर्थांचा पूर्ण भक्त । चोळाप्पा नामे विख्यात । तयाचा हा जामात । श्रापादभट्ट जाणिजे ॥५२॥
स्वामीपुढे भक्तजन । ठेविती द्रव्यादिक आणोन । ते सुंदराबाई उचलोन । नेत असे सत्वर ॥५३॥
त्यामुळे चोळप्पाप्रती । अल्प होई द्रव्यप्राप्ती । बाळाप्पामुळे म्हणती । नुकसान होते आपुले ॥५४॥
तेव्हा जामात श्वशुर । उभयतां करिती विचार । बाळाप्पाते आता दूर । केले पाहिजे युक्तीने ॥५५॥
श्रीपादभट्ट एके दिवशी । काय बोलती बाळाप्पासी । दारापुत्र सोडुनी देशी । आपण येथे राहिला ॥५६॥ आपण आल्यापासोन । आमुचे होते नुकसान । ऐसे बोल ऐकोन । बाळाप्पा मनी खिन्न झाला ॥५७॥
बाळाप्पा बोले वचन । तुमचे अन्न खावोन । करितो तुमचे नुकसान । व्यर्थ माझा जन्म हा ॥५८॥
स्वामींनी मज आज्ञा द्यावी । मी जातो आपुल्या गावी । परी तुम्ही युक्ती योजावी । आज्ञा होईल ऐशीच ॥५९॥
ऐसे ऐकुनिया समर्थ । हास्यमुखे काय बोलत । कुलदेवतेचे दर्शननित्य । बाळाप्पा येथे करीत असे ॥६१॥ तेव्हा निरुत्तर जाहला । ऐसा उपाय खुंटला । मग तयाने पाहिला । कारभार चिठ्ठ्यांचा ॥६२॥
तयाने पुसिले वर्तमान । बाळाप्पा सांगे संपूर्ण । श्रीपादभट्टे ऐकोन । कापट्य मनी आणिले ॥६३॥
म्हणे जावया आपणासी । समर्थ न देती आज्ञेसी । तरी टाकून चिठ्ठ्यांसी । आज्ञा घ्यावी आपण ॥६४॥
तयांचे कपट न जाणोनी । अवश्य म्हणे त्याच दिनी । दोन चिठ्ठ्या लिहोनी । उभयतांसी टाकिल्या ॥६५॥
चिठ्ठी आपुल्या करी । भटजी उचली सत्वरी । येथे राहूनी चाकरी । करी ऐसे लिहिलेसे ॥६६॥
भटजी मनी खिन्न झाला । सर्व उपाय खुंटला । महाराज आता बाळाप्पाला । न सोडतील निश्चये ॥६७॥
स्वामी चरणी दृढ भक्ती । बाळाप्पाची जडली होती । कैसा दूर तयाप्रती । करितील यती दयाळ ॥६८॥
जो केवळ दयाधन । भक्तकाजकल्पद्रुम । विष्णू शंकर दोघेजण । तयांसी शरण सदैव ॥६९॥
इति श्री स्वामी चरित्र । नाना प्राकृत कथा संमत । सदा प्रेमळ परिसोत । द्वादशोऽध्याय गोड हा ॥७०॥