अध्याय 13

। श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥
 

शुक्लपक्षीचा शशिकर । वाढे जैसा उत्तरोत्तर । तैसे हे स्वामी चरित्र । अध्यायाध्यायी वाढले ॥१॥

 

द्वादशाध्यायाचे अंती । श्रीपादभट्ट बाळाप्पाप्रती । कपट युक्तीने फसवू पाहती । परी झाले व्यर्थची ॥२॥

 

खिन्न झाला चोळप्पा । म्हणे श्रींची पूर्ण कृपा । मजहुनी तया बाळाप्पा । प्रिय असे जाहला ॥३॥

 

वर्तले ऐसे वर्तमान । बाळाप्पा एकनिष्ठा धरोन । स्वामीसेवा रात्रंदिन । अत्यानंदे करितसे ॥४॥ स्वयंपाकादिक करावयासी । लज्जा वाटतसे तयासी । तयाते एके समयासी । काय बोलती समर्थ ॥५॥

 

निर्लज्जासी सन्निध गुरु । असे जाण निरंतरु । ऐसे बोलता सद़्गुरु । बाळाप्पा मनी समजला ॥६॥

 

अनेक उपाये करोन । शुद्ध केले बाळाप्पाचे मन । स्वामीविणे दैवत अन्य । नसेचि थोर या जगी ॥७॥

 

सेवेकऱ्यांमाजी वरिष्ठ । सुंदराबाई होती तेथ । तिने सेवेकऱ्यास नित्य । त्रास द्यावा व्यर्थची ॥८॥

 

नाना प्रकारे बोलोन । करी सर्वांचा अपमान । परी बाळाप्पावरी पूर्ण । विश्वास होता तियेचा ॥९॥

 

परी कोणे एके दिवशी । मध्यरात्रीच्या समयासी । लघुशंका लागता स्वामींसी । बाळाप्पाते उठविले ॥१०॥

 

श्रींते धरोनिया करी । घेउनी गेले बाहेरी । पाहोनिया ऐशी परी । बाई अंतरी कोपली ॥११॥

 

म्हणे याने येवोन । स्वामी केले आपणा आधीन । माझे गेले श्रेष्ठपण । अपमान जाहला ॥१२॥

 

तैपासूनी बाळाप्पासी । त्रास देत अहर्निशी । गाऱ्हाणे सांगता समर्थांसी । बाईते शब्दे ताडिती ॥१३॥

 

अक्कलकोटी श्रीसमर्थ । प्रथमतः ज्याचे घरी येत । चोळाप्पा विख्यात । स्वामीभक्त जाहला ॥१४॥

 

एक तपपर्यंत । स्वामीसेवा तो करीत । तयासी द्रव्याशा बहुत । असे सांप्रत लागली ॥१५॥

 

दिवाळीचा सण येत । राजमंदिरामाजी समर्थ । राहिले असता आनंदात । वर्तमान वर्तले ॥१६॥

 

कोण्या भक्ते समर्थांसी । अर्पिले होते चंद्रहारासी । सणानिमित्त त्या दिवशी । अंगावरी घालावा ॥१७॥

 

राणीचिये मनांत । विचार येता त्वरित । सुंदराबाईसी लोबत । चंद्रहार द्यावा की ॥१८॥

 

सुंदराबाई बोलली । तो आहे चोळप्पाजवळी । ऐसे ऐकता त्या काळी । जमादार पाठविला ॥१९॥

 

गंगुलाल जमादार । चोळाप्पाजवळी ये सत्वर । म्हणे द्यावी जा चंद्रहार । राणीसाहेब मागती ॥२०॥

 

चोळाप्पा बोले तयांसी । हार नाही आम्हापासी । बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ॥२१॥

 

ऐसे ऐकुनी सत्वर । गंगुलाल जमादार । बाळाप्पाजवळी येउनी सत्वर । हार मागू लागला ॥२२॥

 

बाळाप्पा बोले सत्वर । आपणापासी चंद्रहार । परी चोळप्पाची त्यावर । सत्ता असे सर्वस्वे ॥२३॥

 

ऐसे ऐकुनी बोलणे । जमादार पुसे चोळाप्पाकारणे । जबाब दिधला चोळप्पाने । बाळाप्पा देती तरी घेईजे ॥२४॥

 

ऐसे भाषण ऐकोन । जमादार परतोन । नृपमंदिरी येवोन । वर्तमान सर्व सांगे ॥२५॥

 

चोळाप्पाची ऐकुन कृती । राग आला राणीप्रती । सुंदराबाईनेही गोष्टी । तयाविरुद्ध सांगितल्या ॥२६॥

 

कारभार चोळाप्पाचे करी । जो होता आजवरी । तो काढूनी तयास दूरी । करावे राणी म्हणतसे ॥२७॥

 

पहिलेच होते बाईच्या मनी । साहाय्य झाली आता राणी । सुंदराबाईचा गगनी । हर्ष तेव्हा न समावे ॥२८॥

 

चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी । धनप्राप्ती तया भारी । समर्थकृपेने होतसे ॥२९॥

 

असो एके अवसरी । काय झाली नवलपरी । बैसली समर्थांची स्वारी । भक्तमंडळी वेष्टीत ॥३०॥

 

एक वस्त्र तया वेळी । पडले होते श्रींजवळी । तयाची करोनिया झोळी । समर्थे करी घेतली ॥३१॥

 

अल्लख शब्द उच्चारिला । म्हणती भिक्षा द्या आम्हाला । तया वेळी सर्वत्राला । आश्चर्य वाटले ॥३२॥

 

झोळी घेतली समर्थे । काय असे उणे तेथे । जे जे दर्शना आले होते । त्यांनी भिक्षा घातली ॥३३॥

 

कोणी एक कोणी दोन । रुपये टाकती आणोन । न लागता एक क्षण । शंभरावर गणती झाली ॥३४॥

 

झोळी चोळाप्पाते देवोन । समर्थ बोले काय वचन । चोळाप्पा तुझे फिटले रीण । स्वस्थ आता बसावे ॥३५॥

 

पाहोनिया द्रव्यासी । आनंद झाला तयासी । परी न आले मानसी । श्रीचरण अंतरले ॥३६॥

 

तयासी झाले मास दोन । पुढे काय झाले वर्तमान । राणीच्या आज्ञेने शिपाई दोन । स्वामीजवळी पातले ॥३७॥

 

त्यांनी उठवून चोळाप्पासी । आपण बैसले स्वामीपाशी । चोळाप्पाच्या मानसी । दुःख फार जाहले ॥३८॥

 

स्वामीपुढे वस्तु येती । त्या शिपाई उचलिती । चोळाप्पाते काही न देती । ने तरी घेती हिरावोनी ॥३९॥

 

चोळाप्पासी दूर केले । बाईसी बरे वाटले । ऐसे काही दिवस गेले । बाळाप्पा सेवा करिताती ॥४०॥

 

कोणे एके अवसरी । सुंदराबाई बाळाप्पावरी । रागावोनी दृष्टोत्तरी । ताडण करी बहुसाळ ॥४१॥

 

ते ऐकोनी बाळाप्पासी । दुःख झाले मानसी । सोडून स्वामीचरणांसी । म्हणती जावे येथोनी ॥४२॥

 

ऐसा केला विचार । जाहली असता रात्र । बाळाप्पा गेले बिऱ्हाडावर । खिन्न झाले मानसी ॥४३॥

 

आज्ञा समर्थांची घेवोनी । म्हणती जावे येथोनी । याकरिता दुसरे दिनी । समर्थांजवळी पातले ॥४४॥

 

आपुली आज्ञा घ्यावयासी । बाळाप्पा येतो या समयासी । अंतर्ज्ञानी समर्थांसी । तत्काळ विदित जाहले ॥४५॥

 

तेव्हा एक सेवेकऱ्यांस । बोलले काय समर्थ । बाळाप्पा दर्शनासी येत । त्यासी आसन दाखवावे ॥४६॥

 

बाळाप्पा येता त्या स्थानी । आसन दाविले सेवेकऱ्यांनी । तेव्हा समजले निजमनी । आज्ञा आपणा मिळेना ॥४७॥

 

कोठे मांडावे आसन । विचार पडला त्यालागून । तो त्याच रात्री स्वप्न । बाळाप्पाने देखिले ॥४८॥

 

श्रीमारुतीचे मंदिर । स्वप्नी आले सुंदर । तेथे जाउनी सत्वर । आसन त्यांनी मांडिले ॥४९॥

 

श्रीस्वामी समर्थ । या मंत्राचा जप करीत । एक वेळ दर्शना येत । हिशेब ठेवीत जपाचा ॥५०॥

 

काढूनी दिले बाळाप्पासी । आनंद झाला बाईसी । गर्वभरे ती कोणासी । मानीनाशी जाहली ॥५१॥

 

सुंदराबाईसी करावे दूर । समर्थांचा झाला विचार । त्याप्रमाणे चमत्कार । करोनिया दाविती ॥५२॥

 

जे कोणी दर्शना येत । त्यांसी बाई द्रव्य मागत । धन-धान्य साठवीत । ऐशा प्रकारे करोनी ॥५३॥

 

बाईची कृत्ये दरबारी । विदित केली थोर थोरी । बाईनी रहावे दूरी । श्रींचरणापासून ॥५४॥

 

परी राणीची प्रिती । बाईवरी बहू होती । याकारणे कोणाप्रती । धैर्य काही होईना ॥५५॥

 

अक्कलकोटी त्या अवसरी । माधवराव बर्वे कारभारी । तयांसी हुकूम झाला सत्वरी । बाईसी दूरी करावे ॥५६॥

 

परी राणीस भिवोनी । तैसे न केले तयांनी । समर्थ दर्शनासी एके दिनी । कारभारी पातले ॥५७॥

 

तयांसी बोलती समर्थ । कैसा करिता कारभार । ऐसे ऐकोनिया उत्तर । बर्वे मनी समजले ॥५८॥

 

मग त्यांनी त्याच दिवशी । पाठविले फौजदारासी । कैद करुनिया बाईसी । आणावी म्हणती सत्वर ॥५९॥

 

आज्ञेप्रमाणे सत्वर । बाईसी बांधी फौजदार । बाई करी शोक फार । घेत ऊर बडवूनी ॥६०॥

 

फौजदारासी समर्थ । काही एक न बोलत । कारकीर्दीचा अंत । ऐसा झाला बाईचा ॥६१॥

 

स्वामीचिया सेवेकरिता । सरकारांतूनी तत्त्वता । पंच नेमूनी व्यवस्था । केली असे नृपराये ॥६२॥

 

मग सेवा करावयासी । घेउनी गेले बाळाप्पासी । म्हणती देऊ तुम्हांसी । पगार सरकारांतूनी ॥६३॥

 

बाळाप्पा बोलले तयांसी । द्रव्याशा नाही आम्हांसी । आम्ही निर्लोभ मानसी । स्वामीसेवा करु की ॥६४॥

 

बाळाप्पाचा जप होता पूर्ण । एका भक्तास सांगोन । करविले श्रींनी उद्यापन । हिशेब जपाचा घेतला ॥६५॥

 

बाळाप्पांनी चाकरी । एक तप सरासरी । केली उत्तम प्रकारी । समर्था ते प्रिय जाहले ॥६६॥

 

अक्कलकोट नगरात । अद्यापि बाळाप्पा रहात । श्रीपादुकांची पूजा करीत । निराहार राहोनी ॥६७॥

 

जे जे झाली स्वामीभक्त । त्यात बाळाप्पा श्रेष्ठ । तयावरी श्री समर्थ । करीत होते प्रेम बहू ॥६८॥

 

ऐसे बाळाप्पाचे चरित्र । वर्णिले असे संकलित । स्वामी चरित्र सारामृत । चरित्रसार घेतले ॥६९॥

 

दृढनिश्चय आणि भक्ती । तैसी सद़्गुरुचरणी आसक्ति । तेणे येत मोक्ष हाती । अन्य साधने व्यर्थची ॥७०॥

 

दृढनिश्चयाचे उदाहरण । हे चरित्र असे पूर्ण । श्रोती होउनी सावधान । श्रवणी आदर धरावा ॥७१॥

 

उगीच करिती दांभिक भक्ती । त्यावरी स्वामी कृपा न करिती । सद़्भावे जे नमस्कारिती । त्यावरी होती कृपाळू ॥७२॥

 

पुढले अध्यायी सुंदर कथा । ऐका श्रोते देऊनी चित्ता । जेणे निवारे सर्व व्यथा । पापराशी दग्ध होती ॥७३॥

 

अक्कलकोटनिवासिया । जयजयाजी स्वामीराया । रात्रंदिन तुझ्या पाया । विष्णू शंकर वंदिती ॥७४॥

 

इति श्री स्वामी चरित्र । नाना प्राकृत कथा संमत । सदा भक्त परिसोत । त्रयोदशोऽध्याय गोड हा ॥७५॥

 

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Translate »