अध्याय 18

। श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥
 

स्वामीसुताच्या गादीवर । कोण नेमावा अधिकारी । ऐसा प्रश्न सेवेकरी । करिताती समर्थांते ॥१॥

 

तेव्हा बोलले समर्थ । सेवेकरी असती सांप्रत । परी एकही मजला त्यांत । योग्य कोणी दिसेना ॥२॥

 

जेव्हा येईल आमुच्या मानसी । त्या समयी मोर पांखरासी । अधिकारी नेमू गादीसी । चिंता तुम्ही न करावी ॥३॥

 

मोर पांखरा मोर पांखरा । समर्थ म्हणती वेळोवेळा । रात्रंदिन तोची चाळा । मोठमोठ्याने ओरडती ॥४॥

 

आमुची पाऱ्याची वीट । जतन करावी नीट । वारंवार म्हणती समर्थ । काकूबाईलागोनी ॥५॥

 

लपवून ठेविले विटेसी । ती दिली पाहिजे आम्हांसी । याचा अर्थ कवणासी । स्पष्ट काही कळेना ॥६॥

 

असो स्वामीसुताचा भ्राता । कोकणांत राहत होता । स्वामीसुत मृत्यु पावता । वर्तमान कळले त्या ॥७॥

 

तो केवळ अज्ञान । दादा तयांचे अभिधान । त्याचे शरीरी असमाधान । कृश होत चालला ॥८॥

 

काकूबाईने तयासी । आणविले आपणापासी । एके दिवशी समर्थांसी । दादाप्रती दाखविले ॥९॥

 

बाळ चालले वाळोनी । यासी अमृतदृष्टीने पाहोनी । निरोगी करावे जी स्वामी । बाई विनवी समर्थांते ॥१०॥

 

समर्थ बोलले बाईसी । चार वेळा जेवू घाला यासी । आरोग्य होईल बाळासी । चिंता मानसी करु नको ॥११॥

 

त्याप्रमाणे बाई करिता । दादासी झाली आरोग्यता । समर्थांची कृपा होता । रोग कोठे राहील ॥१२॥

 

केजगांव मोगलाईत । तेथे नानासाहेब भक्त । त्यांनी बांधिला श्रींचा मठ । द्रव्य बहुत खर्चिले ॥१३॥

 

श्रींची आज्ञा घेऊनी सत्य । पादुका स्थापाव्या मठात । याकारणे अक्कलकोटी येत । दर्शन घेत समर्थांचे ॥१४॥

 

ते म्हणती काकूबाईंसी । पादुका स्थापन करायासी । तुम्ही पाठवा दादासी । समागमे आमुच्या ॥१५॥

 

बाई म्हणे तो अज्ञान । तशात शरीरी असमाधान । त्याची काळजी घेईल कोण । सत्य सांगा मजलागी ॥१६॥

 

परी आज्ञा देतील समर्थ । तरी पाठवीन मी सत्य । मग समर्थांजवळी येत । घेवोनिया दादासी ॥१७॥

 

समर्थे वृत्त ऐकोन । म्हणती द्यावे पाठवून । बाळ जरी आहे अज्ञ । तरी सांभाळू तयासी ॥१८॥

 

काकूबाई बहुत प्रकारे । समर्था सांगे मधुरोत्तरे । दादासी पाठविणे नाही बरे । वर्जावे आपण सर्वांते ॥१९॥

 

समर्थ तियेसी बोलले । त्यात तुमचे काय गेले । आम्हांसी दिसेल जे भले । तेच आम्ही करु की ॥२०॥

 

शेवटी मंडळी सांगाती । दादासी पाठविले केजेप्रती । पादुका स्थापन झाल्यावरती । दादा आला परतोनी ॥२१॥

 

पुढे सेवेकऱ्यांसांगाती । त्यासी मुंबईस पाठविती । ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करिती । यासी स्थापा गादीवरी ॥२२॥

 

ब्रह्मचारीबुवांजवळी । दादासी नेत मंडळी । जी समर्थे आज्ञा केली । ती सांगितली तत्काळ ॥२३॥

 

दादासी करुनी गोसावी । मुंबईची गादी चालवावी । स्वामीसुताची यासी द्यावी । कफनी झोळी निशाण ॥२४॥

 

ब्रह्मचारी दादासी । उपदेशिती दिवस निशी । गोसावी होऊनी गादीसी । चालवावे आपण ॥२५॥

 

दादा जरी अज्ञान होता । तरी ऐशा गोष्टी करिता । नकार म्हणेची सर्वथा । न रुचे चित्ता त्याचिया ॥२६॥

 

यापरी ब्रह्मचाऱ्यांनी । पाहिली खटपट करोनि । शेवटी दादांसी मुंबईहूनी । अक्कलकोटा पाठविले ॥२७॥

 

दादास घेऊनी सत्वरी । श्रीसन्निध आले टाळकरी । तेव्हा दादा घेवोनी तंबुरी । भजन करीत आनंदे ॥२८॥

 

समर्थे ऐसा समयासी । आज्ञा केली भुजंगासी । घेऊनी माझ्या पादुकांसी । मस्तकी ठेव दादाच्या ॥२९॥

 

मोर्चेल आणूनि सत्वरी । धरा म्हणती त्यावरी । आज्ञेप्रमाणे सेवेकरी । करिताती तैसेचि ॥३०॥

 

उपरती झाली त्याच्या चित्ता । हृदयी प्रगटला ज्ञानसविता । अज्ञान गेले लयाते ॥३१॥

 

दादा भजनी रंगला । देहभानहि विसरला । स्वस्वरुपी लीन झाला । सर्व पळाला अहंभाव ॥३२॥

 

धन्य गुरुचे महिमान । पादुका स्पर्श करोन । जहाळे तत्काळ ब्रह्मज्ञान । काय धन्यता वर्णावी ॥३३॥

 

असो दादांची पाहून वृत्ती । काकूबाई दचकली चित्ती । म्हणे समर्थे दादांप्रती । वेट खचित लाविले ॥३४॥

 

ती म्हणे जी समर्था । आपण हे काय करता । दादांचिया शिरी ठेविता । पादुका काय म्हणोनी ॥३५॥

 

समर्थ बोलले तयेसी । जे बरे वाटेल आम्हांसी । तेचि करु या समयासी । व्यर्थ बडबड करु नको ॥३६॥

 

काकूबाई बोले वचन । एकासी गोसावी बनवोन । टाकिला आपण मारुन । इतुकेचि पुरे झाले ॥३७॥

 

ऐकोन ऐसा वचनाला । समर्थांसी क्रोध आला । घाला म्हणती बाईला । खोड्यामाजी सत्वर ॥३८॥

 

काकूबाईने आकांत । करुनि मांडिला अनर्थ । नाना अपशब्द बोलत । भाळ पिटीत स्वहस्ते ॥३९॥

 

परी समर्थे त्या समयी । लक्ष तिकडे दिले नाही । दादांसी बनविले गोसावी । कफनी झोळी अर्पिली ॥४०॥

 

दुसरे दिवशी दादांसी । समर्थ पाठविती भिक्षेसी । ते पाहूनी काकूबाईसी । दुःख केले अपार ॥४१॥

 

लोळे समर्थांच्या चरणांवरी । करुणा भाकी पदर पसरी । विनवीतसे नानापरी । शोक करी अपार ॥४२॥

 

समर्थांसी हसू आले । अधिकचि कौतुक मांडिले । दादांसी जवळ बोलाविले । काय सांगितले तयासी ॥४३॥

 

अनुसया तुझी माता । तिजपाशी भिक्षा माग आता । अवश्य म्हणोनी तत्त्वता । जननीजवळ पातला ॥४४॥

 

ऐसे बाईने पाहोनी । क्रोधाविष्ट अंतःकरणी । म्हणे तुझी ही करणी । लोकापवादा कारण ॥४५॥

 

भिक्षान्न आपण सेवावे । हे नव्हेची जाण बरवे । चाळे अवघे सोडावे । संसारी व्हावे सुखाने ॥४६॥

 

ऐकोनी मातेची उक्ती । दादा तिजप्रती बोलती । ऐहिक सुखे तुच्छ गमती । माते आजपासोनी ॥४७॥

 

पुत्राचे ऐकोन वदन । उदास झाले तिचे मन । असो दादा गोसावी होवोन । स्वामीभजनी रंगले ॥४८॥

 

काही दिवस झाल्यावरी । मग आले मुंबापुरी । स्वामीसुताच्या गादीवरी । बसोन संस्था चालविली ॥४९॥

 

ते दादाबुवा सांप्रती । मुंबई माजी वास्तव्य करिती । काकूबाई अक्कलकोटी । वसताती आनंदे ॥५०॥

 

कलियुगी दिवसेंदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष । ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥५१॥

 

दोघा बंधूंचे ऐसे वृत्त । वर्णिले असे संकलित । केला नाही विस्तार येथ । सार मात्र घेतले ॥५२॥

 

जैसे श्रेष्ठ स्वामीसुत । तैसेची दादाबुवा सत्य । भूवरी जगदोद्धारार्थ । विष्णू शंकर अवतरले ॥५३॥

 

इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा प्रेमळ परिसोत । अष्टदशोऽध्याय गोड हा ॥५४॥

 

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Translate »