अध्याय 2

। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय ।

। श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय ।
 
॥ श्री गणेशाय नमः ॥
 
कामना धरोनी जे भजती । होय त्यांची मनोरथपूर्ति । तैसेचि निष्काम भक्ताप्रती । कैवल्यप्राप्ती होतसे
 
॥१॥
 
नृसिंहसरस्वती प्रगट झाले । अगणित पापी तारिले । कर्दळीवनी गुप्त जहाले । गुरुचरित्री ती कथा
 
॥२॥
 
पुढे लोकोद्धाराकारणे । भाग पडले प्रगट होणे । धुंडिली बहुत पट्टणे । तेचि स्वामी यतिवर्य
 
॥३॥
 
स्वामींची जन्मपत्रिका । एका भक्ते केली देखा । परी तिजविषयी शंका । मनामाजी येतसे
 
॥४॥
 
गुरुराज गुप्त झाले । स्वामीरूपे प्रगटले । त्यांचे शकप्रमाण न मिळे । म्हणोनि शंका पत्रिकेची
 
॥५॥
 
ते केवळ अनादिसिद्ध । खुंटला तेथे पत्रिकावाद । लोकोद्धारासाठी प्रसिद्ध । मानवरूपे जाहले
 
॥६॥
 
अक्कलकोटा-माझारी । राचप्पा मोदी याचे घरी । बैसली समर्थांची स्वारी । भक्तमंडळी वेष्टित
 
॥७॥
 
साहेब कोणी कलकत्त्याचा । हेतू धरोनी दर्शनाचा । पातला त्याच दिवशी साचा । आदर तयाचा केला की
 
॥८॥
 
त्याजसवे एक पारसी । आला होता दर्शनासी । ते येण्यापूर्वी मंडळीसी । महाराजांनी सुचविले
 
॥९॥
 
तीन खुर्च्या आणोनी बाहेरी । मांडा म्हणती एके हारी । दोघांसी बैसवोनी दोहोवरी । तिसरीवरी बैसले आपण
 
॥१०॥
 
पाहोनी समर्थांचे तेज । उभयतांसी वाटले चोज । साहेबाने प्रश्न केला सहज । आपण आला कोठूनी ॥११॥
 
स्वामींनी हास्यमुख करोनी । उत्तर दिले तयालागोनी । आम्ही कर्दळीवनांतुनी । प्रथमारंभी निघालो ॥१२॥
 
मग पाहिले कलकत्ता शहर । दुसरी नगरे देखिली अपूर्व । बंगालदेश समग्र । आम्ही असे पाहिला ॥१३॥
 
घेतले कालीचे दर्शन । पाहिले गंगातटाक पावन । नाना तीर्थे हिंडोन । हरिद्वाराप्रती गेलो
 
॥१४॥
 
पुढे पाहिले केदारेश्वर । हिंडलो तीर्थे समग्र । ऐसी हजारो हजार । नगरे आम्ही देखिली
 
॥१५॥
 
मग तेथुनी सहज गती । पातलो गोदातटाकाप्रती । जियेची महाप्रख्याती । पुराणांतरी वर्णिली
 
॥१६॥
 
केले गोदावरीचे स्नान । स्थळे पाहिली परम पावन । काही दिवस फिरोन । हैदराबादेसी पातलो
 
॥१७॥
 
येउनिया मंगळवेढ्यास । बहुत दिवस केला वास । मग येउनिया पंढरपुरास । स्वेच्छेने तेथे राहिलो ॥१८॥
 
तदनंतर बेगमपूर । पाहिले आम्ही सुंदर । रमले आमुचे अंतर । काही दिवस राहिलो
 
॥१९॥
 
तेथोनि स्वेच्छेने केवळ । मग पाहिले मोहोळ । देश हिंडोनी सकळ । सोलापुरी पातलो
 
॥२०॥
 
तेथे आम्ही काही महिने । वास केला स्वेच्छेने । अक्कलकोटा-प्रती येणे । तेथोनिया जाहले
 
॥२१॥
 
तैपासूनि या नगरात । आनंदे आहो नांदत । ऐसे आमुचे सकल वृत्त । गेले उठोनी उभयता
 
॥२२॥
 
ऐकोनिया ऐशी वाणी । उभयता संतोषले मनी । मग स्वामी आज्ञा घेवोनी । गेले उठोनी उभयता
 
॥२३॥
 
द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती । राहिले स्वामीराज यती । परी त्या स्थळी प्रख्याती । विशेष त्यांची न जाहली
 
॥२४॥
 
सदा वास अरण्यात । बहुधा न येती गावात । जरी आलिया क्वचित । गलिच्छ जागी बैसती
 
॥२५॥
 
कोणी काही आमोनि देती । तेचि महाराज भक्षिती । क्षणैक राहूनि मागुती । अरण्यात जाती उठोनी
 
॥२६॥
 
वेडा बुवा तयांप्रती । गावातील लोक म्हणती । कोणीही अज्ञाने नेणती । परब्रह्मरुप हे
 
॥२७॥
 
त्या समयी नामे दिगंबर । वृत्तीने केवळ जे शंकर । तेव्हा तयांचा अवतार । सोलापुरी जाहला
 
॥२८॥
 
ते जाणोनी अंतरखूण । स्वामींसी मानिती ईश्वरासमान । परी दुसरे अज्ञ जन । वेडा म्हणोनी लेखिती ॥२९॥
 
दर्शना येता दिगंबर । लीलाविग्रही यतिवर्य । कंबरेवरी ठेवूनी कर । दर्शन देती तयासी
 
॥३०॥
 
अमृतासमान पुढे कथा । ऐकता पावन श्रोता वक्ता । स्वामी समर्थ वदविता । ज्यांची सत्ता सर्वत्र
 
॥३१॥
 
अहो हे स्वामी चरित्र । भरला असे क्षिरसागर । मुक्त करोनी श्रवणद्वार । प्राशन करा श्रोते हो
 
॥३२॥
 
तुम्हा नसावा येथे वीट । सर्वदा सेवावे आकंठ । भवभयाचे अरिष्ट । तेणे चुके विष्णू म्हणे
 
॥३३॥
 
इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । आनंदे भक्त परिसोत । द्वितीयोऽध्याय गोड हा
 
॥३४॥
 
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥
Translate »