अध्याय 7

। श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी निर्गुणा । जयजयाजी सनातना । जयजयाजी अघहरणा । लोकपाला सर्वेशा ॥१॥ आपुल्या कृपेकरोन । अल्प वर्णिले आपुले गुण । श्रोती द्यावे अवधान । श्रवणी आदर धरावा ॥२॥
 

अक्कलेकोटी मालोजी नृपती । समर्थचरणी जयाची भक्ति । स्वहस्ते सेवा नित्य करिती । जाणोनी यती परब्रह्म ॥३॥

 

वेदांत आवडे तयासी । श्रवण करिती दिवसनिशी । शास्री हेरळीकरादिकांसी । वेतने देऊनि ठेविले ॥४॥

 

त्या समयी मुंबापुरी । विष्णुबुवा ब्रह्मचारी । प्राकृत भाषणे वेदांतावरी । करुनी लोका उपदेशिती ॥५॥

 

कैकांचे भ्रम दवडिले । परधर्मोपदेशका जिंकिले । कुमार्गवर्तियांसी आणिले सन्मार्गावरी तयांनी ॥६॥

 

त्यांसी आणावे अक्कलकोटी । हेतु उपजला नृपापोटी । बहुत करोनी खटपटी । बुवांसी शेवटी आणिले ॥७॥

 

नृपा आवडे वेदांत । बुवा त्यात पारंगत । भाषणे श्रोतयांचे चित्त । आकर्षूनि घेती ते ॥८॥

 

रात्रंदिन नृपमंदिरी । वेदांतचर्चा ब्रह्मचारी । करिती तेणे अंतरी । नृपती बहु सुखावे ॥९॥

 

अमृतानुभवादि ग्रंथ । आणि ज्ञानेश्वरी विख्यात । कित्येक संस्कृत प्राकृत । वेदांत ग्रंथ होते जे ॥१०॥

 

त्यांचे करोनि विवरण । संतोषित केले सर्व जन । तया नगरी सन्मान । बहुत पावले ब्रह्मचारी ॥११॥

 

ख्याती वाढली लोकांत । स्तुति करिती जन समस्त । सदा चर्चा वेदांत । राजगृही होतसे ॥१२॥

 

जे भक्तजनांचे माहेर । प्रत्यक्ष दत्ताचा अवतार । ते समर्थ यतीश्वर । अक्कलकोटी नांदती ॥१३॥

 

एके दिवशी सहज स्थिती । ब्रह्मचारी दर्शना येती । श्रेष्ठ जन सांगाती । कित्येक होते तया वेळी ॥१४॥

 

पहावया यतीचे लक्षण । ब्रह्मचारी करिती भाषण । काही वेदांतविषय काढून । प्रश्न करिती स्वामींसी ॥१५॥

 

ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार । ऐसे ऐकोनि सत्वर । यतिराज हासले ॥१६॥

 

मुखे काही न बोलती । वारंवार हास्य करिती । पाहून ऐशी विचित्र वृत्ती । बुवा म्हणती काय मनी ॥१७॥

 

हा तो वेडा संन्यासी । भुरळ पडली लोकांसी । लागले व्यर्थ भक्तिसी । याने ढोंग माजविले ॥१८॥

 

तेथोनि निघाले ब्रह्मचारी । आले सत्वर बाहेरी । लोका बोलती हास्योत्तरी । तुम्ही व्यर्थ फसला हो ॥१९॥

 

परमेश्वररुप म्हणता यती । आणि करिता त्याची भक्ति । परी हा भ्रम तुम्हांप्रती । पडला असे सत्यची ॥२०॥

 

पाहोनि तुमचे अज्ञान । याचे वाढले ढोंग पूर्ण । वेदशास्रादिक ज्ञान । याते काही असेना ॥२१॥

 

ऐसे ब्रह्मचारी बोलोनी । पातले आपुल्या स्वस्थानी । विकल्प पातला मानी । स्वामींसी तुच्छ मानिती ॥२२॥

 

नित्यनियम सारोन । ब्रह्मचारी करिती शयन । जवळी पारशी दोघेजण । तेही निद्रिस्थ जाहले ॥२३॥

 

निद्रा लागली बुवांसी । लोटली काही निशी । एक स्वप्न तयांसी । चमत्कारिक पडलेसे ॥२४॥

 

आपुल्या अंगावरी वृश्चिक । एकाएकी चढले असंख्य । महाविषारी त्यातुनी एक । दंश आपणा करीतसे ॥२५॥

 

ऐसे पाहोनी ब्रह्मचारी । खडबडोनी उठले लौकरी । बोबडी पडली वैखरी । शब्द एक ना बोलवे ॥२६॥

 

जवळी होते जे पारशी । जागृती आली तयांसी । त्यांनी धरोनी बवांसी । सावध केले त्या वेळी ॥२७॥

 

हृदय धडाधडा उडू लागले । धर्मे शरीर झाले ओले । तेव्हा पारशांनी पुसले । काय झाले म्हणोनी ॥२८॥

 

मग स्वप्नीचा वृत्तांत । तयासी सांगती समस्त । म्हणती यात काय अर्थ । ऐसी स्वप्न कैक पडती ॥२९॥

 

असो दुसऱ्या दिवशी । बुवा आले स्वामींपाशी । पुसता मागील प्रश्नासी । खदखदा स्वामी हासले ॥३०॥

 

मग काय बोलती यतीश्वर । ब्रह्मपदी तदाकार । होण्याविषयी अंतर । तुझे जरी इच्छितसे ॥३१॥

 

तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी । काय म्हणोनी भ्यालासी । जरी वृथा भय मानितोसी । मग ब्रह्मपदी जाणसी कैसे ॥३२॥ ब्रह्मपदी तदाकार होणे । हे नव्हे सोपे बोलणे । यासी लागती कष्ट करणे । फुकट हाता न येचि ॥३३॥

 

बुवांप्रती पटली खूण । धरिले तत्काळ स्वामीचरण । प्रेमाश्रूंनी भरले नयन । कंठ झाला सद़्गदित ॥३४॥

 

त्या समयापासोनी । भक्ती जडली स्वामीचरणी । अहंकार गेला पळोनी । ब्रह्मपदा योग्य झाले ॥३५॥

 

स्वामीचरित्र महासागर । त्यातूनी मुक्ते निवडूनी सुंदर । त्याचा करोनिया हार । अर्पी शंकर-विष्णुकवी ॥३६॥

 

इति श्री स्वामी चरित्र महासागर । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत भाविक भक्त । सप्तमोध्याय गोड हा ॥३७॥

 

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Translate »