श्री स्वामी समर्थ

ओम श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री  स्वामी समर्थ महाराज की जय!

मठाधिपती श्री अभिनव गिरी गुरुजी यांचे मनोगत व दृष्टांत

 

सर्व स्वामी भक्तांना नमस्कार श्री स्वामी समर्थ,

प्रथमता जर सांगायचे झाले तर आम्ही कोल्हापूर येथील करवीर तालुका पाडळी बुद्रुक या गावचे रहिवाशी आहोत तसेच याच करवीर क्षेत्री करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई च्या छत्रछायेखाली वसलेले क्षेत्र म्हणजेच श्री क्षेत्र प्रयाग, याच पवित्र आणि अमृतमय क्षेत्राचे आम्ही मुख्य पुजारी आहोत , तसेच येथे पाच नद्यांचा पवित्र असा संगम असुन; या स्थानाचा उल्लेख भारतातील महान व पवित्र असा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथ, या ग्रंथांमध्ये श्री सरस्वती गंगाधर यांनी अतिशय सुंदर अश्या वाक्यरचनेमध्ये केलेला आहे,

या तीर्थ क्षेत्राची महती सर्वत्र आहे जसे प्रयागराज उत्तरकाशी अगदी तितकेच व अनन्यसाधारण असे महत्त्व या तीर्थक्षेत्राला आहे त्यामुळे या क्षेत्राला दक्षिण काशी असे संबोधले गेले आहे

याच तीर्थ क्षेत्रावर श्री संगमेश्वर महादेव मंदिर, कुमार कार्तिक स्वामी मंदिर, श्री दत्तात्रेय मंदिर, श्री मोहिनीगिरी महाराज यांची जिवंत समाधी, अशी अनेक मंदिर असून येथे अनेक प्रकारचे धार्मिक विधी व शांती कर्म होत असतात,

    सन २०१२ पासून याच पवित्र तीर्थक्षेत्रावर अन्नदानासारखी पवित्र सेवा सुरू व्हावी अशी माझी मनापासून ची इच्छा असायची, पण तेव्हा प्रसादाचे नियोजन कसे करावे काही सुचत नव्हते, काही वर्षे अशीच गेली त्यानंतर गुरु आज्ञा झाली आणि सन २०२० साली मार्गशीष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी पासुन अन्नदान सेवा सुरू केली ,

तसेच ही सेवा करत असताना खूप संकटांना व अडचणींना तोंड द्यावे लागले, त्यातच प्रयाग क्षेत्रावरील उत्तरेकडील थोड्या जमिनीवर प्रसादाचे नियोजन करावे  असा विचार करत असताना पावसाला सुरुवात झाली मग महापुरानंतर अन्नदान सेवा पुन्हा सुरू करावी म्हणून सर्व नियोजन करण्यात आले पण काही केल्या प्रसादाला सुरुवात होत नव्हती बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते ; पण प्रसादाला काही केल्या सुरुवात होत नव्हती ,डोळ्यात अश्रू दाटून आले होते ,

आणि मी तसाच दत्त मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन बसलो, आणि श्री दत्तगुरूंना जीवाच्या मोठ्या तळमळीने बोललो की; महाराज मी मनापासून ही सेवा अगदी प्रामाणिकपणे बजावत असतो, मी तुमच्या भक्तीमध्ये पूर्ण लीन झालो आहे ही सेवा पुन्हा सुरू व्हावी आणि मला योग्य तो मार्ग दाखवावा,अशी प्रार्थना केली पण दत्तगुरूंनी काहीच संकेत दिले नाहीत ,त्या क्षणी मी पूर्ण नाराज झालो मग दुःखी मनाने मी परत घरी आलो त्या दिवशी अन्नाचा एक कण सुद्धा मी ग्रहण केला नव्हता, अन्नदान सेवा हा एकच ध्यास मनामध्ये होता, त्याच दिवशी रात्री श्री दत्तगुरूंचे नामस्मरण करता करता कधी निद्रा लागली समजलेच नाही ,आणि मध्यरात्री मी गाढ झोपेत असताना एक दृष्टांत झाला त्यामध्ये एक प्रकाश ज्योत दिसू लागली आणि श्री स्वामी माऊलींची प्रतिकृती समोर आली आणि त्यातून एकच आवाज आला “काय रे? दमलास का ? खचून जाऊ नको ज्या ठिकाणी तू 

 

अन्नदान सेवा करत आहेस,तिथेच माझे वास्तव्य आहे, तू सुरुवात कर मी आहे तुझ्यासोबत! मला अचानक दचकूनजाग आली, माझे अंग घामाने पूर्ण भिजले होते मी वाट पाहत होतो ती म्हणजे कधी एकदा सकाळ होते याची ,

सकाळ झाल्यानंतर मी उठून सर्व आवरले आणि सर्वांना तो दृष्टांत सांगितला मग तेव्हा आम्ही म्हणजे २०२१ या साला मध्ये देव दिपावली दिवशी श्री क्षेत्र प्रयाग या स्थानाच्या उत्तर बाजूस जिथे अन्नदान सेवा सुरू होती त्या ठिकाणी स्वामींची मूर्ती रुद्राभिषेक करून स्थापित केली,आणि श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करून अन्नदानाला पुन्हा सुरुवात केली,

   या अन्नदान सेवेचा लाभ सर्व भाविक भक्त मोठ्या आनंदाने घेऊ लागले स्वामी सेवा व स्वामींच्या भक्तांची सेवा करण्यातच मी माझे सुख आणि आनंद शोधू लागलो. सर्व स्वामी भक्तांच्या रूपात साक्षात स्वामी माझ्या पाठीशी उभे राहिले, दिवस सरले त्या मागोमाग वर्ष ही सरली दर गुरुवारी होणाऱ्या अन्नदान सेवेला भक्तांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला कोणी भुकेला त्याची भूक भागू लागली, कोणी प्रसाद घ्यायच्या भावणेनी प्रसाद घेऊ लागले, तर कोणी स्वामी सेवेत गुंग होऊन नामस्मरणाचा जयघोष करत प्रसाद घेऊ लागले, अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झाले, तसेच दर गुरुवारी होणारी ही अन्नदान सेवा स्वामी कृपेने आजही कार्यरत आहे,

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ 🙏